
वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे म्हाडाने विक्रीसाठी घरे आणि व्यावसायिक गाळ्यांसाठी 82 मजली चार टॉवर आणि 48 मजली दोन टॉवर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या या इमारतींचा आराखडा बनवण्याचे काम सुरू असून तो अंतिम झाल्यावर नेमकी किती घरे आणि व्यावसायिक गाळे म्हाडाकडे विक्रीसाठी उपलब्ध होतील याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होईल.
म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. वरळीतील 121 चाळींमधील 9689 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 40 मजली 34 टॉवर उभारले जाणार आहेत. सध्या इमारत क्रमांक 1 मधील 8 विंगपैकी 7 विंगचे काम जवळपास पूर्ण झाले असून ओसी मिळताच डी आणि ई विंगमधील 556 रहिवाशांना लवकरच घराच्या चाव्या दिल्या जाणार आहेत. बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनातून विक्रीसाठी घरे उभारण्याकरिता म्हाडालादेखील मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे. या घरांची विक्री म्हाडा बाजारभावाने करणार आहे.
विमानतळ प्राधिकरण आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा
वरळी बीडीडी चाळीच्या जागेवर 82 मजली चार टॉवर आणि 48 मजली दोन टॉवर उभारण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. त्यासाठी तीन चाळींचे पाडकाम आणि पाईल फाऊंडेशन टेस्टिंगचे काम सुरू आहे. विमानतळ प्राधिकरण आणि पर्यावरण विभागाची परवानगी मिळताच इमारतीचा आराखडा अंतिम होईल. त्यानंतर या ठिकाणी नक्की किती मजली टॉवर उभे राहणार आणि किती घरे, व्यावसायिक गाळे विक्रीसाठी उपलब्ध होणार हे स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.