फुकट्या लोकल प्रवाशांना ‘नारीशक्ती’चा हिसका

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे. फुकट्या प्रवाशांना हेरून दंडात्मक कारवाई करण्यात महिला टीसींनी विक्रमी कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरातील तिकीट तपासणीच्या विशेष मोहिमांमध्ये दोन महिला टीसींनी तब्बल 12,290 प्रवाशांना पकडले आणि त्यांच्याकडून 54 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. महिला टीसींच्या या हिसक्याने फुकट्या प्रवाशांची भंबेरी उडवली आहे.

रेल्वे प्रशासनाच्या सेवेत महिला कर्मचाऱयांनी आपल्या शानदार कामगिरीचे दर्शन घडवले आहे. लोकल ट्रेनसह लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये तिकीट तपासणीच्या कामातही महिला टीसींनी चांगले योगदान दिले आहे. मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल आणि उपमुख्य तिकीट निरीक्षक मल्लिगा यांच्या खात्यात रेकॉर्डब्रेक कामगिरीची नोंद झाली आहे. पटेल यांनी लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये, तर मल्लिगा यांनी लोकल ट्रेनमध्ये सर्वाधिक फुकट्या प्रवाशांना पकडले आणि त्या प्रवाशांकडून दंडाच्या रूपात रेल्वेला सर्वाधिक महसूल प्राप्त करून दिला आहे. नयना पटेल यांनी 2024 मध्ये 4470 हून अधिक विनितिकीट प्रवाशांना पकडले आणि त्यांच्याकडून दंडआकारणी करून जवळपास 33 लाख रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त केला. तसेच दादरच्या मल्लिगा यांनी जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत लोकलमधून फुकट प्रवास करणाऱया 7820 जणांवर कारवाई केली आणि त्यांच्याकडून 21 लाख 50 हजारहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला.

n गर्दीच्या वेळी फुकटय़ा रेल्वे प्रवाशांना पकडून दंड वसूल करण्याचे आव्हान असते. अनेकदा पुरुष टीसींच्या हातून काही प्रवासी पळ काढतात. अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करीत महिला टीसींनी विक्रमी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.