”आज जो तुरुंगात (वाल्मीक कराड) आहे, त्याने माझ्यासोबत मारहाण केली. त्याने माझ्या गालावर मारलं आणि मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केलं. असं असूनही या महाराष्ट्रात कोणीच काहीच करत नाही. मुख्यमंत्रीही काही करत नाही. माझ्या कुटुंबातील लोकही शांत बसतात,” असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत. आज वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवलं आहे. तसेच करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत.
यावेळी करुणा मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, वाल्मीकी कराड यांनी तुम्हाला मारहाण केली असं तुम्ही म्हणत आहात, याबाबत तुम्ही धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ”वाल्मीक कराड मला मारहाण करताना धनंजय मुंडे स्वतः तिथे होते, पोलीस कर्मचारीही होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यलयात सगळ्यांच्या समोर मला मारहाण करण्यात आली आहे.”
त्या म्हणाल्या की, ”ज्यावेळी वाल्मीक कराड याने मला मारहाण केली, त्यावेळी मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनाही मी निवेदन दिलं. मी त्यांना म्हणाले, मला फक्त येथील सीसीटीव्ही फुटेज द्या, मला तुमचा न्याय नको. आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलं नाही.”