‘आरएफआयडी’च्या ड्रॉपबॉक्समध्ये गुटख्याची पाकिटे आणि पिचकारी, मंत्रालयाच्या शिस्तीला बेशिस्तीची किनार

मंत्रालयात प्रवेश देण्यासाठी डीजी प्रवेश नावाची आधुनिक यंत्रणा सुरू झाल्यानंतर प्रत्येक व्हिजिटर्सला आरएफआयडी कार्ड देण्यास सुरुवात झाली. मंत्रालयातून बाहेर पडताना ही आरएफआयडी कार्ड प्रवेशद्वारावरील ड्रॉपबॉक्समध्ये टाकली जातात, पण ही आरएफआयडी कार्ड ड्रॉपबॉक्समध्ये टाकताना त्या बॉक्समध्ये गुटख्याची पाकिटे आणि गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्या जात असल्याचे दिसून आले आहे.

मंत्रालयातील गर्दी कमी करण्याबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून फेशिअल रेकग्नेशन सिस्टीम सुरू झाली. व्हिजिटर्सना डीजी अॅपच्या माध्यमातून प्रवेश देण्याची योजना आखली आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी आधारकार्ड आणि फोटो काढल्यावर आरएफआयडी कार्ड दिले जाते. व्हिजिटर्सनी हे कार्ड गळय़ात घालून फिरणे अपेक्षित आहे आणि मंत्रालयातून बाहेर पडताना प्रवेशद्वारावरील ड्रॉपबॉक्समध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात.

आरएफआयडी बाहेर काढण्यासाठी ड्रॉपबॉक्समध्ये हात घातला तर पानाच्या पिचकाऱ्या लागतात. सोबत बिस्किटाचे रिकामे पुडे, तंबाखूच्या रिकाम्या पुडय़ा हाताला लागतात असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पास गोळा करण्यासाठी आम्ही डबा उघडला तेव्हा प्रचंड दुर्गंधी आली. मंत्रालयातील कारभाराला शिस्त लावण्यासाठी ही सर्व नवीन यंत्रणा लावण्यात आली आहे, पण व्हिजिटर्सच्या बेशिस्त वर्तनाने या ड्रॉपबॉक्सना कचरापुंडी बनवली आहे अशी खंत एका अधिकाऱयाने व्यक्त केली.

मंत्रालयात प्रवेश करताना व्हिजिटर्सना पाण्याच्या बाटल्या प्रवेशद्वारावर जमा कराव्या लागतात. पोलीस तपासणीमध्ये खिशातील गुटख्याची पाकिटे, मावा, तंबाखूच्या पुड्या बाहेर काढल्या जातात, पण तरीही अनेक व्हिजिटर्स वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून गुटख्याची-माव्याची पाकिटे मंत्रालयात घेऊन शिरतात. त्यामुळे इमारतीच्या कोपऱ्यात, स्वच्छतागृहात पानाच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात, तर काही व्हिजिटर्स मंत्रालयातून बाहेर पडताना आरएफआयडीची कार्ड ही ड्रॉपबॉक्समध्ये टाकतात, पण त्यासोबत खिशातील गुटख्याच्या रिकाम्या पुड्या आणि तंबाखूच्या पिचकाऱ्या या ड्रॉपबॉक्समध्ये टाकतात.