Mumbai News – हाजी अली दर्गा बॉम्बने उडवण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील हाजी अली दर्गा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली. तसेच जो कोणी जवळ येईल त्याला गोळ्या घालू, अशी धमकीही आरोपीने दिली. हाजी अली दर्ग्याच्या कार्यालयात फोन करुन आरोपीने धमकी दिली. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव पवन असे सांगितले. सदर फोन दिल्लीतून आल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 351(2), 352, 353(2) आणि 353(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ताडदेव पोलीस आणि गुन्हे शाखा प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत.

आरोपीने मंगळवार आणि बुधवारी दोन वेगवेगळे मोबाईल वापरून दोन धमकीचे फोन केले. पहिला कॉल 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास केला होता. हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा आरोपीने केला आणि तो परिसर त्वरित रिकामा करण्यास सांगितले, अशी माहिती हाजिअली दर्गाचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर शेख यांनी दिली.

दर्गा रिकामा न केल्यास तो उडवून देण्याची धमकी दिली आणि जो कोणी जवळ येईल त्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा इशारा पुढे आरोपीने दिला. त्यानंतर लगेचच दुसरा धमकीचा कॉल आला. खबरदारीचा उपाय म्हणून हाजी अली परिसराची तपासणी करण्यात आली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.