घाटकोपरमध्ये भीषण अपघात, टेम्पोने 5 जणांना चिरडले; एका महिलेचा मृत्यू

कुर्ला येथे भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी घाटकोपर परिसरात तसाच अपघात घडला. भरधाव टेम्पोने पाच जणांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

चिराग नगर मार्केट परिसरात सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. टेम्पोने पाच पादचाऱ्यांना चिरडले. अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी चालकाला बेदम चोप देत घाटकोपर पोलिसांच्या स्वाधीन केले.

नारायण नगर येथून थंड पेय घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचे चिराग नगर मार्केट परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटले. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेवेळी टेम्पो चालक नशेत होता. टेम्पोने एका महिलेला चिरडत नेले. तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पुढे अजून चार जणांना चिरडले. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.