
सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. लाडक्या बापाला सर्वत्र भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनादरम्यान खार येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. बाप्पाचे विसर्जन करताना दोघे समुद्रात बुडाले. मात्र पोलिसांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी दोघांचेही प्राण वाचवले. दोन्ही तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खार पश्चिमेकडील कार्टर रोड येथे दोन तरुण गणपती विसर्जनासाठी समुद्रात गेले होते. मात्र गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण समुद्रात बुडू लागले. समुद्रावर गस्तीवर असलेले सहायक फौजदार राजू गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास बाबर, पोलीस शिपाई रमेश वळवी आणि पोलीस शिपाई मोकाशी यांना तरुण बुडत असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच या पोलीस पथकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेतली आणि तरुणांना वाचवले. बेशुद्ध तरुणांना सीपीआर दिल्यानंतर शुद्ध आली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.