इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात 2 टक्के सूट मिळणार

मुंबईमधील इमारती, आस्थापनांमध्ये सोलर पॅनल बसवून पालिकेच्या पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेला हातभार लावल्यास संबंधितांना मालमत्ता करात 2 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. याबाबत पालिका लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास नगर विकास विभागाचीही परवानगी घेण्यात येणार आहे. याआधी 2006 मध्ये सरकारने रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे बंधनकारक केले. मात्र याकडे अनेक सोसायटय़ांकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने सोसायटय़ांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केले तर मालमत्ता करात 2 टक्के सवलत देण्याची घोषणा पालिकेने केली. शिवाय कचऱयाचे वर्गीकरण करून ओल्या कचऱयाची विल्हेवाट लावणाऱया सोसायटय़ांनाही मालमत्ता करात 2 टक्के सवलत देण्याची कार्यवाहीदेखील पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. तर आता सोलर पॅनल बसवणाऱया सोसायटय़ांनाही करात सूट देण्याची पालिकेची योजना प्रस्तावित आहे.