ताज हॉटेलसमोर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या आढळल्या, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

ताज हॉटेलसमोर एकाच नंबर प्लेटच्या दोन कार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका गाडीच्या मालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर कुलाबा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही ताब्यात घेतल्या. दोन्ही गाड्या कुलाबा पोलीस ठाण्यात आणत पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही गाड्या ताज हॉटेलसमोर आढळून आल्या. दोन्ही गाड्या मारूती सुझुकी कंपनीच्या आहेत. दोन्ही गाड्यांवर MH01EE2388 अशी नंबर प्लेट लावण्यात आली आहे.

मूळ नोंदणी असलेल्या गाडी मालकाने कुलाबा पोलिसात याबाबत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या. दुसरी गाडी कुणाची आहे? याबाबत पोलीस तपास करत आहेत.