
टास्कच्या नावाखाली कापड व्यापारी महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन ठगांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. तेजस धेदर आणि अभिषेक कांबळे अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार या महिला असून त्या कांदिवली येथे राहतात. फेब्रुवारी महिन्यात त्याना एकाने मेसेज पाठवला. गुगल मॅपवरून रेटिंग दिल्यास कमिशन दिले जाईल. त्यावर विश्वास ठेवून तिने एका हॉटेलला रेटिंग दिले होते. त्यानंतर तिच्या खात्यात 200 रुपये जमा झाले होते. महिलेने तिचे विविध टास्क पूर्ण केले. तिच्या खात्यात 5 हजार 770 रुपये जमा झाले होते. त्यामुळे तिला विश्वास निर्माण झाला होता. ठगाने तिला एक लिंक पाठवून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. तिने टास्क पूर्ण करताना एक लाख रुपयाची गुंतवणूक केली होती. तिला त्या टास्कवर चांगला फायदा झाल्याचे दिसले. तिला कमिशनची रक्कम मिळाली नाही. त्या रकमेबाबत तिने विचारणा केली तेव्हा तिला ग्रुपमधून बाहेर काढले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. तांत्रिक महिलेच्या आधारे पोलिसांनी तेजस आणि अभिषेकला ताब्यात घेतले. त्या दोघांनी ठगांना बँक खाती पुरवली होती. त्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाला होती. बँक खाती पुरवण्याच्या मोबदल्यात त्या दोघांना काही रक्कम कमिशन म्हणून मिळत होती.