
राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही उन्हाची तीव्रता वाढतीच आहे. अनेक जिह्यांतील तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे दुपारी उन्हात चालणे नकोसे झाले आहे. रविवारी मुंबईकरांनीही कडक उन्हाचे चटके सहन केले. सांताक्रुझमध्ये 34 अंश तापमान नोंद झाले. याचवेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून मुंबई शहर व उपनगरांत तापमानात मोठी वाढ नोंद होत आहे. काही दिवस सूर्य जणू आग ओकत असल्याची स्थिती होती. गेल्या आठवड्यात तापमान सरासरीच्या पातळीवर आले. मात्र हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 90 टक्क्यांच्या घरात गेल्याने मुंबईकरांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. सांताक्रुझमध्ये रविवारी सकाळी किमान तापमानात 2 अंशांची वाढ झाली आणि पारा 24 अंशांवर गेला. त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी फिरायला घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना सकाळपासूनच घामाच्या धारा लागल्या होत्या.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर मुंबईचे तापमान सरासरी पातळीवर राहील. मात्र हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहिल्याने मुंबईकरांना उन्हाची तीव्रता अधिक भासेल. आठवडाभर 33 ते 34 अंशांच्या आसपास कमाल तापमान नोंद होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.