मुंबईतील जेजे रुग्णालयात डॉक्टरांनी दुर्मिळ शस्त्रक्रिया करत एका महिलेला जीवदान दिले आहे. महिलेच्या पोटातून तब्बल 13.25 किलो वजनाची गाठ काढण्यात आली आहे. अमरीन शेख असे शस्त्रक्रिया केलेल्या महिलेचे नाव आहे. डॉ. राजेश यादव, डॉ. सुप्रिया भोंडवे आणि डॉ. काशिफ अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली तीन तासाची ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. तर डॉ. भरत शाह यांनी रुग्णाला भूल दिली.
वरळी येथील रहिवासी असलेल्या अमरीन शेख या महिलेला पोटदुखी आणि पोट फुगल्याचा त्रास होत होता. तिच्या पोटाचा घेरही वाढला होता. यामुळे तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अल्ट्रासाऊंड तपासणीनंतर महिलेच्या पोटात ट्यूमर असल्याचे निदान झाले. तिची प्रकृती बिघडली होती.
विस्तृत चाचण्यांनंतर, सर्जिकल टीमने ट्यूमरचा आकार आणि जटिलतेमुळे लॅपरोस्कोपीऐवजी ओपन-सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत महिलेच्या पोटातून ट्यूमर काढला.
“या प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत दुर्मिळ असून वर्षातून एकदा किंवा दोनदाच होते,” असे सामान्य शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले. शस्त्रक्रियेपूर्वी ट्यूमरची बायोप्सी करण्यात आली होती, त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी ट्यूमरचा काही भाग पुढील चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे, असे ते पुढे म्हणाले.