आधुनिक सावित्रीच्या दानाने सत्यवानाला नवजीवन, नानावटी रुग्णालयात लहान आतड्याचे यशस्वी प्रत्यारोपण

सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते. अशाच एका आधुनिक सावित्रीने केलेल्या दानाने तिच्या पतीला नवजीवन मिळाले. जयश्रीने दिलेल्या लहान आतड्याच्या तुकड्याचे तिचे 49 वर्षीय पती प्रवीण विसपुते यांच्या पोटात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. गौरव चौबळ आणि त्यांच्या टीमने ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. या वर्षीचे मुंबईतील हे पहिले यशस्वी प्रत्यारोपण आहे.

नाशिकचे रहिवासी असलेले प्रवीण विसपुते ग्लास फॅक्टरीमध्ये काम करतात. त्यांना सतत संसर्ग, ताप आणि पोटामध्ये असह्य वेदना असे त्रास होत होते. त्यांच्या लहान आतड्याला गँगरीन झालेले होते. लहान आतड्याला होणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये दुर्मिळ आणि जीवघेणे ब्लॉकेज झालेले होते. प्रत्यारोपण हाच त्यावर पर्याय होता, असे डॉ. चौबळ यांनी सांगितले.

जयश्री यांच्या लहान आतड्याचा काही भाग काढून तो प्रवीण यांच्या पोटात प्रत्यारोपित करण्यात आला. उपचारानंतर आता पती-पत्नी दोघांचीही प्रकृती ठीक आहे.

पोटातील अवयवांच्या सर्व प्रत्यारोपणांमध्ये लहान आतड्याचे प्रत्यारोपण हे सर्वात दुर्मिळ मानले जाते. एका वर्षभरात संपूर्ण जगभरात जवळपास 100 लहान आतड्यांची प्रत्यारोपणे केली जातात आणि त्यापैकी 7 ते 8 हिंदुस्थानात केली जातात.