एसटीला चिंचपोकळीचा वळसा घालावा लागणार, एल्फिन्स्टन पूल कामाचा ‘लाल परी’च्या सेवेवर परिणाम

एल्फिन्स्टन पूल पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याआधी वाहतूक पोलीस सध्या पर्यायी मार्गांची चाचपणी करीत आहेत. एल्फिन्स्टन पुलावरून होणारी एसटी बसची वाहतूक चिंचपोकळी पूलमार्गे वळवण्यात येणार आहे. यात प्रत्येक एसटी बसला जवळपास पाच किमीचा वळसा घालावा लागणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला एल्फिन्स्टन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत मोठय़ा आर्थिक नुकसानीची झळ बसणार आहे.

प्रभादेवीच्या पश्चिमेकडे असलेल्या परळ एसटी आगारातून राज्यभरात ये-जा करणाऱया जवळपास 70 ते 80 एसटी बसची एल्फिन्स्टन पुलावरून ये-जा सुरू असते. एल्फिन्स्टन पूल पाडण्यात येणार असल्याने वाहतूक पोलिसांनी एसटी महामंडळाला वाहतूक बदलाबाबत सूचना केली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने करी रोड आणि चिंचपोकळी या दोन्ही पुलांची उपलब्धता व व्यवहार्यता तपासली. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर करी रोडच्या पुलावरून विशिष्ट वेळेत एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. तथापि, एसटी बसची दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. त्याचा विचार करून एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने चिंचपोकळी पुलावरून एसटीची बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परळ आगार ते पूर्वेकडील मडकेबुवा चौक हे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी एसटी बसना जवळपास पाच किमीचा वळसा घालावा लागणार आहे. यात इंधनाचा वापर वाढेल आणि महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

n परळ एसटी आगारातून दररोज 70 ते 80 बसची एल्फिन्स्टन पुलावरून वाहतूक सुरू असते. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर या गाडय़ा मडके बुवा चौक (परत टीटी जंक्शन), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, कृष्ण जंक्शनवरून परळ वर्कशॉपमार्गे सुपारी बाग जंक्शन, भारतमाता, संत जगनाडे चौक, चिंचपोकळी या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

n परळ आगारातील शिवनेरी गाडय़ांना चार्ंजगसाठी दादर येथील शिवनेरी बसस्थानकात फेरी मारावी लागते. परळच्या 12 व पुण्याच्या 12 अशा एकूण 24 शिवनेरी गाडय़ांची परळ आगारातून सेवा सुरू आहे. या गाडय़ांना चार्ंजगसाठी जाता-येता दहा किमीचे अंतर कापावे लागणार आहे.