घाटकोपरच्या चिरागनगरात थरार, भरधाव टेम्पोची पाच जणांना धडक तरुणीचा जागीच मृत्यू; चौघे जखमी

घाटकोपरच्या चिरागनगरात आज संध्याकाळी थरारक घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका भरधाव टेम्पोने पाच पादचाऱ्यांना धडक दिली. या दुर्घटनेत 35 वर्षीय तरुणीचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर अन्य चौघे किरकोळ जखमी झाले. टेम्पोचालकाला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.
संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास टेम्पो चिरागनगर येथील मच्छी मार्केट मार्गावरील आझाद मसाला शॉपसमोर येताच चालक उत्तम खरात (25) याचे नियंत्रण सुटले.

परिणामी गजबजलेला असलेल्या या मार्गावर भरधाव टेम्पोने सहा जणांना धडक दिली. त्यात घाटकोपरच्या पारशीवाडीत राहणारी प्रीती पटेल (35) हिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर रेश्मा शेख (23), मारुफा शेख (27), मोहरम अली अब्दुल रहिम शेख (28), तोफा उजहर शेख (38) हे चौघे जखमी झाले. जखमी व्यक्ती हे नातेवाईक असल्याचे समजते. या अपघातामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच टेम्पो थांबल्याने मोठा अनर्थ टळला. घाटकोपर पोलिसांनी टेम्पोचालक उत्तम खरात याला ताब्यात घेतले आहे.

फिटचा आजार

फिट येण्याचा आजार असल्याचे चालकाचे म्हणणे आहे. अपघात होण्यापूर्वी तो त्रास झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. परंतु घाटकोपर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. चौकशीअंती अपघात नेमका कसा झाला ते समजू शकेल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

मोठा अनर्थ टळला

कुर्ला पश्चिमेकडे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. घाटकोपरच्या चिरागनगरात त्या घटनेची पुनरावृत्ती होणार होती, परंतु सुदैवाने तसे काही घडले नाही. पण काळजाचा थरकाप उडाला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.