वरळीच्या सेंच्युरी म्हाडा कॉलनीत आज खळबळजनक घटना घडली. विशेष सुरक्षा पथकात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार संतोष मस्के यांच्या 20 वर्षीय मुलाने राहत्या घरातल्या बाथरूममध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मुलाने हे टोकाचे पाऊल का उचलले ते मात्र समजू शकले नाही.
हर्ष मस्के (20) असे त्या मुलाचे नाव होते. हर्ष याने वडिलांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेऊन तो बाथरूममध्ये गेला आणि एक गोळी डोक्यात मारली. यात हर्षचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घरात सुसाईड नोट किंवा आक्षेपार्ह काहीच सापडले नाही. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना हर्ष रिव्हॉल्व्हर घेऊन बाथरूममध्ये गेला आणि डोक्यात गोळी झाडून घेतली.
घटना घडली तेव्हा संतोष मस्के हे गावी गेले होते, तर हर्षची आई कामाला आणि बहीण शाळेत गेली होती. तसेच हर्षची आजी परिसरात फेरी मारत होत्या. त्या दुसऱया दरवाजाने बाथरूममध्ये गेल्या असता हर्ष रक्ताच्या थारोळय़ात बसलेला आढळून आला. त्यानंतर हर्षने आत्महत्या केल्याचे समोर आले. हर्षने हे टोकाचे पाऊल का उचलले ते रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.