
एका 30 वर्षीय माथेफिरू तरुणाने 17 वर्षीय मुलीवर पेट्रोल टाकून तिला भररस्त्यात जाळल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना अंधेरीत घडली आहे. त्यात मुलगी 65 टक्के भाजली असून कूपर रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे.
पीडित मुलगी ही अंधेरी परिसरात राहते. तिची परिसरातीलच जितेंद्र तांबे या तरुणासोबत मैत्री होती. त्यातून ते दोघे भेटत होते. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांना परिसरात स्थानिकांनी फिरताना पाहिले होते. त्याबाबत मुलीच्या आईला सांगण्यात आले असता तिने मुलीकडे विचारणा केली. त्यावर आमच्यात मैत्री असून प्रेमसंबंध नसल्याचे तिने सांगितले. त्याचवेळी त्या तरुणाला पुन्हा भेटू नको, असे आईने बजावले होते.
पीडितेची प्रकृती चिंताजनक
रविवारी पीडित मुलगी जेवण झाल्यानंतर तिच्या मैत्रिणी कडे गेली होती. रात्री साडे अकराच्या सुमारास हा तरुण तेथे आला आणि त्याने भररस्त्यात या मुलीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या प्रकाराने सगळेच हादरले. दरम्यान, काही स्थानिकांनी धाव घेत पाणी टाकून आग विझवली आणि तातडीने पीडितेला कूपर रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर तिथे उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तिला सध्या काही बोलताही येत नाही. दरम्यान, यात हल्लेखोर तरुणही जखमी झाला आहे.
फोन उचलत नसल्याचा राग
माझ्या मुलीला यापुढे भेटायचे नाही, असे पीडितेच्या आईने या तरुणाला भेटून सांगितले होते. ती मुलगीही गेले काही दिवस त्याच्यासोबत संवाद ठेवत नव्हती. त्याचा फोन उचलत नव्हती. त्याचा राग त्याला होता. त्यातून जाब विचारण्यासाठी तो तिच्या घराजवळ गेला. त्यानंतर त्याने सोबत आणलेले पेट्रोल मुलीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले, असे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.