बस चालवताना मोबाईलवर मॅच पाहणं महागात पडलं, शिवनेरी बस चालकावर कारवाई

बस चालवत असताना मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणे शिवनेरी बसच्या चालकाला चांगलेच महागात पडले आहे. बसमधील प्रवाशांनी चालकाचा व्हिडिओ बनवून परिवहन मंत्र्यांना पाठवला. यानंतर परिवहन मंत्र्यांनी अ‍ॅक्शन मोडवर येत संबंधित चालकावर कारवाईचे आदेश एसटी महामंडळाला दिले. त्यानुसार एसटी महामंडळाने चालकाला बडतर्फ केले असून,संबंधित खासगी संस्थेला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सदर शिवनेरी बस 21 मार्च रोजी सायंकाळी दादरहून पुण्याला रवाना झाली. यादरम्यान लोणावळाजवळ चालक बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहत होता. यावेळी एका प्रवाशाने त्याचा हा कारनामा मोबाईलमध्ये कैद केला आणि परिवहन मंत्र्यांना व्हिडिओ पाठवला. यानंतर एसटी महामंडळाने सदर बस चालकाविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.