
मुंबईतील अपुऱ्या आणि गढूळ पाण्यावर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीसह मानखुर्द, मुलुंड, विक्रोळी, भायखळा आणि कुलाब्यामध्ये शिवसेनेने जोरदार मोर्चे काढून महापालिका विभाग कार्यालयांपर्यंत सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज पोहोचवला. यावेळी ‘बिल्डरला पुरवठा पाण्याचा, रिकामी हंडा मुंबईकरांचा’, ‘एक दो एक दो, राज्य सरकार को फेक दो’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमले. दरम्यान, मोर्चानंतर त्या त्या विभागातील शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने संबंधित वॉर्ड ऑफिसरला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भायखळा विधानसभेच्या वतीने उपनेते आमदार मनोज जामसुतकर यांच्या नेतृत्वाखाली ई विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने पालिका उपायुक्त आणि ई विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, संतोष शिंदे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, राम सावंत, विजय कामतेकर, सुनील कदम, सोनम जामसुतकर, कीर्ती शिंदे, सुजाता आवळेगावकर, कल्पना सुर्वे, बबन गावकर, सुरेखा राऊत, विधानसभा संघटक मंगेश बनसोड, चंदना साळुंखे, सूर्यकांत पाटील, हेमंत कदम, रमाकांत रहाटे, अंजली मोरे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
शिवसेना नेते, विभागप्रमुख, आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वर्सोवा विधानसभा व अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने जुन्या कोळीवाड्यापासून ते वर्सोवा कोळीवाड्यापर्यंत रहिवाशांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज के-पश्चिम विभागीय कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांना निवेदन देण्यात आले. येत्या 15 दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर हे आंदोलन तीव्र स्वरूपात करू आणि संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर बसू देणार नाही, असा इशारा अॅड. अनिल परब यांनी दिला. विधानसभा संघटक शैलेश फणसे, संजय मानाजी कदम यांच्या वतीने आयोजित या मोर्चामध्ये आमदार हारुन खान, विभाग संघटक अनिता बागवे, समन्वयक बाळा आंबेरकर, उपविभागप्रमुख राजेश शेटये, प्रसाद आयरे, समन्वयक मेघना काकडे-माने, महिला संघटक वीणा टॉक, विधानसभा समन्वयक सुनील खाबिया, ज्योत्स्ना दिघे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मोर्चात विभागातील महिला, स्थानिक पाण्याचे रिकामे हंडे घेऊन शिवसैनिकांसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या.
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्या वतीने दूषित पाणी, कमी दाबाचे पाणी, खोदून ठेवलेले रस्ते, कचऱ्यावरील प्रस्तावित कर या विरोधात आज मुंबई महापालिका ‘ए’ वार्ड कार्यालयावर मोर्चा काढून पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. आंदोलनात शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर यांच्यासह दक्षिण मुंबईतील शिवसेना, युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील पाणीटंचाई, दूषित पाणी, कमी दाबाने येणारे पाणी या समस्यांना वाचा फोडण्यासाठी विक्रोळी, कांजूरमार्गमधील महापालिकेच्या एस वॉर्डवर हंडा मोर्चा काढण्यात आला. यात महिलांचा सहभाग मोठा होता. आंदोलनात आमदार सुनील राऊत, उपनेते दत्ता दळवी, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, विभाग संघटिका राजराजेश्वरी रेडकर, दीपमाला बढे, राजोल पाटील सहभागी झाले होते. मोर्चानंतर शिवसेना शिष्टमंडळाने एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 च्या वतीने मानखुर्द-शिवाजीनगर विभागात दूषित पाणी, कमी दाबाने पाणीपुरवठा, अघोषित पाणीकपात, नालेसफाईत दिरंगाई, खड्डे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि प्रस्तावित कचरा कराविरोधात आज ‘एम पूर्व’ विभागावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ, विधानसभाप्रमुख संजय चव्हाण, उपविभागप्रमुख हेमंत साळवी, तात्या सारंग, अख्तर शेख, माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे, माजी नगरसेविका समीक्षा सव्रे, मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभेचे सर्व महिला/पुरुष विधानसभा संघटक, विधानसभा निरीक्षक, सहसंघटक, सहसमन्वयक, उपविभाग समन्वयक, शाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पाण्याच्या वेळेत होणारा सतत बदल याचा निषेध करण्यासाठी शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एच-पूर्व कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, उपविभागप्रमुख सुदेश दुबे, विभाग संघटक रजनी मेस्त्री, पूजा सुर्वे, शशिकांत येलमकर, उदय दळवी, अलका साटम, दीपिका साटम, संदीप शिवलकर, रामचरण चंदेलिया, संतोष गुप्ता, संतोष कदम, अरुण कांबळे, वसंत गावडे, शाखा संघटक सुषमा गवस, अजिजा पटेल, अंजली जाधव, अमिता आव्हाड उपस्थित होते.
मुंबई महापालिकेचे के (पूर्व) विभाग कार्यालय गुंदवली येथे शिवसेनेच्या वतीने जोगेश्वरी पूर्व विभागातील रहिवाशांना होणाऱ्या अपुऱ्या व दूषित पाणीपुरवठ्याच्या विरोधात हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना नेते विभागप्रमुख आमदार अनिल परब, आमदार बाळा नर, जोगेश्वरी विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, महिला विभाग संघटिका शालिनी सावंत, प्रमोद सावंत, कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, अशोक मिश्रा, सुगंधा शेटये, प्रकाश भोसले, संजय सावंत यांच्यासह शिवसैनिक व नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पाणीटंचाई, गढूळ पाणीपुरवठ्याबरोबर अपूर्ण नालेसफाई, म. तू. अगरवाल रुग्णालय खासगीकरण करण्याचा घातलेला घाट या विरोधात मुलुंड विधानसभाप्रमुख पुरुषोत्तम दळवी, नंदिनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या टी विभाग कार्यालयावर आज हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागप्रमुख दिनेश जाधव, सीताराम खांडेकर, नितीन चवरे, व्यंकटेश अय्यर, उपविभाग संघटक हेमलता सुकाळे, सुनीता धोंगडे, शीला सोनावणे, रूपाली सुभेदार, चंद्रकांत शेलार, अमोल संसारे, आनंद पवार, अॅड. सागर देवरे आदी उपस्थित होते.