‘बेस्ट’च्या बसने कुर्ल्यात अनेक निष्पापांचा बळी घेतल्यानंतर बेस्टच्या अपघातांमध्ये आणखीनच वाढ झाल्यामुळे पालिकाही अलर्ट मोडवर आली असून आपल्या ताफ्यातील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हरना सुरक्षित ड्रायव्हिंगचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ड्रायव्हरना सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्यामुळे पालिकेच्या गाड्यांचाही प्रवास सुरक्षित होणार आहे.
बेस्टच्या कुर्ला येथील अपघातात आठ जणांचा बळी गेल्यामुळे मुंबईतील सर्वच गाड्यांच्या सुरक्षित ड्रायव्हिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे पालिकेनेही आपल्या ड्रायव्हरना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका आयुक्त, चार अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंत्यांसह अन्य अधिकारी व काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्याही दिमतीला चारचाकी वाहने आहेत. शिवाय कचरा वाहक गाड्या, डंपरही आहेत. पालिकेच्या मालकीची 200 आणि खासगी कंपनीच्या 800 हून अधिक लहान-मोठ्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या आहेत. यामध्ये काही वेळा या गाड्यांकडून अपघात झाल्याच्या घटना घडतात.
विशेषतः कचरावाहक गाड्या, डंपरकडून बेदरकारपणे वाहन चालविणे, मार्गिका बदलणे, ओव्हरटेक करणे आदींमुळे अपघात होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही वेळा पादचारी, प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडत असल्यामुळे पालिकेला टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने डंपर चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांना दोन प्रकारे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
नॅशनल सेफ्टी काऊन्सिलिंग, तज्ञांची मदत घेणार
जानेवारी 2025 पासून या प्रशिक्षणाला सुरुवात केली जाणार आहे. चालकांची संख्या पाहता 12 ते 15 बॅचमध्ये टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारणतः आठवडाभर हे प्रशिक्षण सुरू राहण्याची शक्यता आहे. सिम्युलेटरबरोबरच चालकांचे वर्ग प्रशिक्षणही घेतले जाईल. त्यांना वाहतुकीचे नियम समजावण्यात येतील. यासाठी नॅशनल सेफ्टी काऊन्सिल ऑफ इंडियाची मदत घेतानाच वाहतूक क्षेत्रातील एका बड्या कंपनीची तसेच तज्ञांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाकडून देण्यात आली.