‘जेजे’मध्ये रोबोने केली पाच लाखांची शस्त्रक्रिया मोफत, मुंबईतील ठरले पहिले सरकारी रुग्णालय

सर जे.जे. रुग्णालयात तब्बल पाच लाखांचा खर्च येणारी शस्त्रक्रिया रोबोटने अगदी मोफत केली. त्यामुळे रोबोटने शस्त्रक्रिया करणारे जे.जे. हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. दोन रुग्णांवर जटील शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

डोंबिवलीचे शंकर परबसह आणखी एका रुग्णावर ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. परब यांना गेल्या काही महिन्यांपासून त्यांना हर्नियाचा त्रास होता. शस्त्रक्रियेसाठी त्यांना जे.जे.च्या जनरल सर्जरी विभागात दाखल करण्यात आले होते. खासगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियेसाठी तब्बल पाच लाख रुपयांचा खर्च येतो. परंतु हीच शस्त्रक्रिया रोबोटच्या माध्यमातून अगदी मोफत करण्यात आली. तर आणखी एका रुग्णावर पोट आणि अन्ननलिका जिथे जोडली जाते तेथील जटील शस्त्रक्रिया करण्यात आली.

शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. गिरीश बक्षी, डॉ. अमोल वाघ, सुप्रिया भोंडवे आणि डॉ. काशिफ अन्सारी यांनी यात सहभाग घेतला. गरीब रुग्णांना अवाक्याबाहेरचा खर्च परवडत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने अशा शस्त्रक्रियांसाठी जे.जे. रुग्णालयात रोबोट खरेदी केला आहे. दरम्यान, लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियांसाठी सर्जन्सना कौशल्य पणाला लावावे लागते. रुग्णालयात अन्न नलिकेचा कॅन्सर, फुप्फूसाजवळच्या जटील शस्त्रक्रिया रोबोच्या माध्यमातून करण्या येणार आहेत असे भंडारवार यांनी सांगितले.