
भाजप आमदारांनी सादर केलेली लव्ह जिहाद आणि सक्तीने धर्मांतर ही दोन्ही खाजगी विधेयके फेटाळून लावावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहून केली आहे. सरकारने फेब्रुवारीमध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली, जी बळजबरी किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून कायदा तयार करणार आहे.
या समितीमध्ये महिला आणि बाल कल्याण, अल्पसंख्याक, विधी व न्याय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि गृह या प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यानंतरही गेल्या आठवड्यात भाजपच्या दोन आमदारांनी सक्तीच्या धर्मांतराच्या मुद्द्यावर खासगी विधेयके मांडली आहेत. लव्ह जिहाद या कथित मुद्द्याचे राजकारण करण्याचा आणि दोन्ही समुदायांमध्ये वैर निर्माण करण्यासाठी सदर विधेयके आणली असल्याचे शेख यांनी पत्रात नमूद केले आहे.