दादरचे हनुमान मंदिर वाचवण्यासाठी भक्त झुंजणार, बुलडोझर अंगावर घेऊ, पण मंदिराला हात लावू देणार नाही!

दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस बजावणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. हे हनुमान मंदिर आमची अनेक वर्षांची श्रद्धा आहे. त्यावर मनमानीपणे कारवाई करू देणार नाही. ‘बुलडोझर अंगावर घेऊ, पण हनुमान मंदिराला हात लावू देणार नाही!’ असा एल्गार भाविकांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या नोटिसीविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशाराही भाविकांनी दिला आहे.

दादर पूर्व येथे मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्र. 12 जवळील हनुमान मंदिराचे बांधकाम अनधिकृत ठरवून भाजप सरकारने त्यावर हातोडा उगारला आहे. हे बांधकाम सात दिवसांत हटवावे अन्यथा आम्ही कारवाई करून पाडकामाचा खर्चही वसूल करू, अशी मुजोर नोटीस मध्य रेल्वेच्या कार्यकारी सहाय्यक मंडल इंजिनीयरकडून मंदिराच्या विश्वस्तांना बजावण्यात आली आहे. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये आज वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाविकांसह सर्वच मुंबईकरांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक मंदिराच्या पाठिंब्याची भावना व्यक्त करीत आहे. कारवाई तर सोडाच, हात तर लावून दाखवा, असा इशाराच भाविकांकडून मुजोर रेल्वे प्रशासनाला देण्यात येत आहे.

श्री हनुमान मंदिराला मध्य रेल्वेने नोटीस बजावल्याचे कळताच प्रत्येक भाविकाकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. कोणत्याही परिस्थितीत मंदिर तोडू देणार नाही. यासाठी लढा देण्यास आम्ही तयार आहोत अशी भूमिका भाविकांकडून मांडली जात असल्याचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे आज दर्शन घेणार

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकालगत असलेल्या या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या भेट देणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता मंदिरात येऊन आदित्य ठाकरे हनुमानाचे दर्शन घेणार आहेत.

नोटीस मागे घ्या अन्यथा आंदोलन

श्रीहनुमान मंदिराची आठ दशकांपूर्वी गोरगरीब हमालांनी एकत्र येत मोठ्या श्रद्धेने स्थापना केली. याच ठिकाणी साईबाबांचेही छोटे मंदिर आहे. त्यामुळे अगदी भल्या पहाटेपासून दादर स्थानकावर येणारे प्रवासी अगदी मनोभावे हनुमानाचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला जातात. त्यामुळे आमच्या श्रद्धास्थानाला बेकायदा ठरवून कारवाई करण्याची हिंमत केली तर मुजोर मध्य रेल्वे प्रशासनाला धडा शिकवू असे सांगतानाच, मंदिर वाचवणारच, असा ठाम निर्धार भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने मुजोरपणे पाठवलेल्या नोटिसीमुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून प्रशासनाने पाठवलेली नोटीस तातडीने मागे घ्यावी अन्यथा जोरदार आंदोलन करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे.