वांद्रे शासकीय वसाहतीमधील 55 वर्षे जुना वृत्तपत्र विक्रेत्याचा स्टॉल पीडब्ल्यूडीने हटवला आहे. संबंधित वृत्तपत्र विक्रेत्याची त्याच विभागात तात्पुरता स्टॉल देण्याची मागणी होती. मात्र या विक्रेत्याचा स्टॉल पाडून त्याला वाऱ्यावर सोडले आहे. दुकानाऐवजी त्याची मालवणी येथील प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव (पीएपी) असलेल्या घरावर बोळवण केली आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न या वृत्तपत्रविक्रेत्यापुढे उभा राहिला आहे.
हायकोर्टाची नवीन वास्तू बांधण्यासाठी पीडब्लूडीने वांद्रे शासकीय वसाहतीमधील 800 घरे आणि 42 दुकाने हटवली आहेत. यात वृत्तपत्र विक्रेत्या विजया सावंत यांच्या स्टॉलचा देखील समावेश आहे. 1970 पासून माझा वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल या ठिकाणी असून यावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. असे असताना देखील मला दुकानाऐवजी मालवणी येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घर दिले आहे. ही इमारत अनेक वर्षे बंदावस्थेत होती. येथे सोयीसुविधांचा देखील अभाव आहे. या घरातून मी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय कसा करणार, असा सवाल विजया सावंत यांनी विचारला आहे.
त्याच विभागात तात्पुरता स्टॉल द्या
व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना त्याच विभागात तात्पुरते गाळे उपलब्ध करून द्यायला हवे होते. मात्र आमच्यासह इतर दुकानदारांना दुकानाऐवजी कांदिवली, बोरिवली, मालवणी या विभागात घरे दिली आहेत, असे विजया सावंत यांनी सांगितले. आमचे तात्पुरते स्थलांतर देखील वांद्रे शासकीय वसाहतीमध्येच करावे, जेणेकरून आमच्या व्यवसायाला फटका बसणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे पदाधिकारी मनोहर परब आणि प्रकाश कानडे यांनी वृत्तपत्र विक्रेत्याच्या तोडलेल्या स्टॉलला नुकतीच भेट दिली आणि त्याच विभागात स्टॉल उपलब्ध करून देण्याची मागणी केली.