पोलीस न्यू इंडिया बँकेच्या तिजोऱ्यांची तपासणी करणार, तिसरा आरोपी अरुणभाई सापडेना

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सर्व बाबींचा कसून तपास करीत आहे. पोलीस आता बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव येथील तिजोऱ्यांची तपासणी करणार आहेत. इतकी मोठी रक्कम ठेवण्याइतपत बँकांच्या तिजोऱ्यांची क्षमता आहे का याची तपास पथक तपासणी करणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने आतापर्यंत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात बँकेचा जनरल मॅनेजर अॅण्ड अकाऊंटंट तसेच या गफल्याचा मुख्य मास्टरमाइंड हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांचा समावेश आहे. या गुह्यातील तिसरा आरोपी आणि सोलर पॅनलचा व्यावसायिक अरुणचिल्लम ऊर्फ अरुणभाई हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी बँकेचा माजी कार्यकारी अधिकारी अभिमन्यू बोमन तसेच सीए अभिजित देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे.

गोरेगावच्या तिजोरीत 10 कोटी कमी आढळले

आरबीआयने 12 फेब्रुवारी रोजी बँकेच्या प्रभादेवी व गोरेगाव येथील तिजोऱ्यांची पाहणी केली असता प्रभादेवी येथील तिजोरीतील 112 कोटी तर गोरेगाव येथील तिजोरीतील 10 कोटी कमी असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड ठेवण्याची त्या तिजोऱ्यांची क्षमता आहे का याची पोलीस पथक तपासणी करणार आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी बँकेच्या ऑडिट तपासणीवर भर दिला आहे.