रिक्षात विसरलेली 25 तोळे सोन्याची बॅग पोलिसांनी शोधून महिलेला केली परत

रिक्षात विसरलेली 25 तोळे सोन्याची बॅग बांगूर नगर पोलिसांनी शोधून काढून ती महिलेला परत केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आधारे पोलिसांनी ती बॅग शोधून काढत महिलेला न्यू इअरचे गिफ्टच दिले आहे. बांगूर नगर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मालाड येथे महिला राहते. 20 डिसेंबरला ती महिला रिक्षाने प्रवास करत होती. रात्री प्रवासा दरम्यान ती रिक्षात बॅग विसरली.रिक्षातून उतरल्यानंतर बॅग नसल्याचे तिच्या लक्षात आले. महिलेने रिक्षाचा शोध घेतला. त्यानंतर तिने बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्या प्रकाराची माहिती बांगूर नगर पोलिसांना दिली. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक संजय सरोळकर, भोसले, शेलार, राठोड, पाटील, दळवी आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रिक्षाचा नंबर मिळण्यास अडचणी येत होत्या. एका आठवडय़ानंतर पोलिसांनी त्या रिक्षाचा नंबर मिळवला. त्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 25 तोळे सोने असलेली बॅग ताब्यात घेतली. ती बॅग पोलिसांनी महिलेकडे सुपूर्द केली.