मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या क्रीडा संकुलातील शारीरिक शिक्षण विभागाच्या आवारात आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा सुरू असताना विटांच्या भिंतीचा भाग कोसळला. सुदैवाने दुर्घटनेत विद्यार्थी थोडक्यात बचावले.
मुंबई विद्यापीठाचे कलिना येथील क्रीडा संकुल एका खासगी असोसिएशनला भाड्याने चालवायला दिलेले आहे. संकुलातील भिंतीचा भाग कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या संकुलातील जीर्ण झालेल्या इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्यात यावी आणि त्यानंतर तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या वतीने तत्काळ दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
कुलगुरूंनी राजीनामा द्यावा!
दुर्घटना घडली त्या ठिकाणाचा पाहणी दौरा आज सकाळी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी केला. यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, मयूर पांचाळ, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते. दरम्यान, भिंतीला मोठे भगदाड पडले असतानाही आजही तिथे लहान मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी पालकही उपस्थित होते. दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अभियंत्यांनी पाहणी करायला हवी होती. मात्र, युवासेनेने याबाबत कळवूनही याची दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतलेली नाही. या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.