
45 वर्षांहून अधिक वय असल्यास परदेशात नोकरी मिळत नाही म्हणून बिहारच्या एका नागरिकाने शक्कल लढवली. त्याने जन्मवर्ष कमी दाखवून बनावट कागदपत्र बनवले आणि त्याआधारे पासपोर्ट व यूएई देशाचा एम्प्लॉयमेंट व्हिसा मिळवला. पण मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची लपवाछपवी उघड पडली. इमिग्रेशनला कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस अंमलदाराने फोटोवरून त्याच्या वयात तफावत असल्याचे हेरले आणि त्या प्रवाशाचा वयाचा झोल पकडला गेला.
त्रिलोकी शर्मा (46) असे त्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. अबुधाबी येथे नोकरीकरिता तो मुंबईहून निघाला होता. शुक्रवारी तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला असता इमिग्रेशनवर तैनात असलेल्या दर्शना जाधव यांनी त्याचे पारपत्र, बोर्डिंग पास आणि यूएई देशाचा एम्प्लॉयमेंट व्हिसा तपासला. तेव्हा त्रिलोकी याचे प्रत्यक्ष आणि पारपत्रावरील फोटोत दिसणारे वय यात तफावत दिसून आली. त्यामुळे दर्शना जाधव यांनी त्याला वरिष्ठांकडे नेले. मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर त्रिलोकी शर्मा याने वयाचा झोल केल्याचे कबूल केले.
माझी दोन मुले अबुधाबी येथे कामाला आहेत. मलाही नोकरीकरिता तेथे जायचे आहे, परंतु वय 46 असल्याने तेथे नोकरी मिळाली नसती. त्यामुळे जन्मवर्ष 1979 असे असताना ते 1987 असे दाखवून बनावट कागदपत्रे बनवली. मग त्याआधारे बिहार येथील पारपत्र काढले, असे त्रिलोकी याने सांगितले.