मुलींच्या वसतिगृहात वीज, पाणी, जेवणाची गैरसोय, मुंबई विद्यापीठाची युवासेनेने केली पोलखोल

पंचतारांकित दर्जा प्राप्त असलेल्या मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला असून मुलींचे मादाम कामा वसतिगृह म्हणजे वीज, जेवण, पाणी आणि सुविधांच्या गैरसोयीचे आगार बनले आहे. युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी अचानक वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी या गैरसोयी आणि असुविधांचा पाढा मुलींनी त्यांच्यासमोर मांडला.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे प्राप्त तक्रारींची दखल घेऊन युवासेना व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवसेना उपनेत्या शीतल शेठ-देवरुखकर, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी नरीमन पॉइंट येथील मुंबई विद्यापीठाचे मादाम कामा मुलींच्या वसतिगृहाला अचानक भेट देऊन मुलींच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वसतिगृहात सुमारे 126 विद्यार्थिनी तेथे असूनही कॅन्टीन-मेसची सुविधा नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थिनी बाहेरून जेवण-चहापान-नाश्ता मागवून खात आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरेशी नाही. सात मजल्यांपैकी फक्त तीन मजल्यावर वॉटरकुलर आहेत तर आंघोळीकरिता फक्त दोन गिझर प्रत्येक मजल्यांवर आहेत. जवळपास 200 विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या वसतिगृहास पूर्णवेळ वॉर्डन नाही.

विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात

वसतीगृहाच्या प्रत्येक मजल्यावर आवश्यक टय़ुबलाईट व्यवस्था नाही. अनेक लाईट बंद आहेत. पहिल्या मजल्यावरील छप्पर कोसळलेले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे. अग्निप्रतिबंधक प्रणाली पूर्णपणे कोलमडली आहे. काही ठिकाणी दोन ते तीन खोल्यांमध्ये अनावश्यक सामान ठेवून विद्यार्थिनींना प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले आहे.