
एकवेळ कोर्टाच्या तारखा मिळतात, परंतु रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या चाचण्यांसाठी तारखा मिळत नाहीत अशी स्थिती महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयांमध्ये आहे. विधानसभेतही यावर चर्चा झाली. मुंबईतील तब्बल 100 वर्षे पूर्ण झालेल्या केईएम रुग्णालयात मात्र आता अशी स्थिती नाही. या रुग्णालयात एमआरआय स्कॅनसाठी तारखा पडणार नाहीत. कारण आणखी एक एमआरआय स्कॅन मशीन लवकरच दाखल होणार आहे. तसेच आणखी दोन सोनोग्राफी मशीनही आणण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.
केईएम रुग्णालयात सध्या एकच एमआरआय स्कॅन मशीन आहे, तर दोन सीटी स्कॅन मशीन आहेत. त्यामुळे सीटी स्कॅनच्या तुलनेत एमआरआयसाठी रुग्णांना तब्बल दोन महिने वाट पाहावी लागत होती. अनेक रुग्णांना जेजे किंवा वाडिया रुग्णालयात पाठवावे लागत होते. तिथेही रुग्णांना तारखाच मिळायच्या. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत होती.
केवळ इमर्जन्सी केसेसमध्ये रुग्णांना तत्काळ एमआरआय स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती, परंतु आता आणखी एक एमआरआय स्कॅन मशीन आणण्यात येणार असून रुग्णांची गैरसोय दूर होईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली. दरम्यान, रुग्णांना मोफत आणि अधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीआर निधीतून रोबोट आणण्यात आला. या माध्यमातून मोठ्या संख्येने गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.
दोन सोनोग्राफी मशीन आणणार
रुग्णालयात सध्या सहा सोनोग्राफी मशीन असून दिवसाला 200 हून अधिक सोनोग्राफी चाचण्या होतात. आता सीएसआर म्हणजेच सामाजिक दायित्व निधीतून आणखी दोन सोनोग्राफी मशीन रुग्णालयाला मिळणार आहेत, असे डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
रोज 100 ते 150 सीटी स्कॅन
रुग्णालयात आता दोन सीटी स्कॅन मशीन असून रोज 100 ते 150 सीटी स्कॅन होत आहेत. आता आणखी एक एमआरआय स्कॅन मशीन येणार असल्याने चाचणीसाठी रुग्णांना अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही, असे ऑर्थोपेडिक स्पोर्टस् इन्जरी सर्जन डॉ. रोशन वाडे यांनी सांगितले.