नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम जोरात, 1400 घरांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

>> मंगेश दराडे

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यासाठी चाळी रिक्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील 1401 घरांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नायगाव बीडीडीवासीयांचा नवीन वर्षात नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे.

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येत आहे. नुकतीच या चाळींच्या पुनर्विकासाच्या दुसऱया टप्प्याला सुरुवात झाली. त्यासाठी चाळ क्र. 8 अ ते 12 अ मधील 30 पोलीस सेवा निवासस्थानातील कर्मचाऱयांना स्थलांतरित करण्यासाठी म्हाडामार्फत संक्रमण गाळे पोलीस विभागास देण्यात आले आहेत. तसेच 21 पोलीस विभागाच्या कार्यालयीन कामकाजाचे गाळे असे एकूण 51 गाळे पोलीस विभागाकडून रिक्त करून म्हाडास पुनर्विकासासाठी हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही पोलीस विभागाकडून तत्काळ झाल्यास दुसऱया टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 2 मधील टॉवर क्र. 17, 18 व 19 चे काम सुरू करणे म्हाडास शक्य होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

म्हाडा उभारतेय 65 मजली गगनचुंबी टॉवर

एकीकडे नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरे देण्यासाठी टॉवरचे काम सुरू असताना म्हाडाने आता विक्रीयोग्य घरांसाठी गगनचुंबी टॉवर उभारण्याची देखील तयारी सुरू केली आहे. म्हाडातर्फे विक्रीयोग्य घरांसाठी 65 मजली 4 टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 2 टॉवरचे खोदकाम तसेच बांधकामपूर्व शोअर पाईलिगचे काम प्रगतीपथावर आहे. साधारण 1800 घरे म्हाडाला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

23 मजली आठ टॉवर

नायगाव येथील बीडीडी चाळीतील भाडेकरूंची संख्या 3344 असून दोन टप्प्यांत पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात रहिवाशांना संक्रमण शिबीर किंवा भाडय़ाचा पर्याय देऊन 21 चाळी रिक्त करण्यात आल्या आहेत. पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील 23 मजली 8 टॉवरचे काम प्रगतीपथावर असून त्या इमारतींचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.