कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी पगार मिळत नसल्यामुळे गेल्या महिन्यापासून संपावर आहेत. मात्र त्यामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य आणि कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे रुग्णालय प्रशासनाने कामगारांचे प्रश्न सोडवावेत आणि दोन दिवसांत कचरा उचलावा नाही तर बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात के.एच.एफ.एम. कंत्राटदार असलेले साफसफाई कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे संपावर आहेत. त्यामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झालेला आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने चिटणीस वृषाली परुळेकर यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. त्यानुसार उपनगरीय रुग्णालयाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत पवार यांच्याशी बोलून त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
पवार यांनी कंत्राटदाराशी बोलून रुग्णालयातील स्वच्छता राखली जाईल व या कामगारांना वेळेवर पगार देण्यास सांगितले. दरम्यान, शताब्दी रुग्णालयातील कामगार आणि कचरा आणि घाणीचा प्रश्न दोन दिवसांत सुटला नाही तर कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला आहे.