तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून उद्या, रविवारी उपनगरीय मार्गावर माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱया डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 11.25 ते दुपारी 3.27 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा ब्लॉक कालावधीत रद्द राहतील. पश्चिम रेल्वेवरील भाईंदर ते बोरिवली या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.