एफएसएलमध्ये सायबर व गंभीर प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती मिळेना, 100 हून अधिक अधिकाऱ्यांची आवश्यकता

<<< आशीष बनसोडे >>>

राज्याच्या न्यायिक व तांत्रिक (एफएसएल) विभागामध्ये कामांचा अक्षरशः डोंगर उभा आहे. सायबर व अन्य गंभीर गुह्यांची प्रकरणे या विभागात दररोज दाखल होत असताना त्यावर काम करण्यासाठी मात्र आवश्यक मनुष्यबळ नसल्याचे गंभीर चित्र आहे. काम भरपूर असून त्याचा निपटारा करण्यासाठी यंत्रणादेखील उपलब्ध आहे, पण त्यासाठी महत्त्वाचे असलेले मनुष्यबळच पुरेसे नसल्याने आहे त्या अधिकाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे.

सायबर गुह्यांचे प्रमाण दिवसागणिक प्रचंड वाढत आहे. रक्ताचा एक थेंबही न सांडवता आरोपी ऑनलाइन पद्धतीने गुन्हे करत आहेत. अशी भयावह परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला दरोडे, हत्या, बलात्कार, अॅण्टी करप्शन ब्युरोचे ट्रप असे गंभीर गुन्हेदेखील घडत आहेत. या गुह्यांत वापरलेले मोबाईल, लॅपटॉप तसेच सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर आदी तांत्रिक बाबी तपासणी व विश्लेषणासाठी एफएसएलमध्ये आणले जातात. एफएसएलमध्ये त्यावर आवश्यक कारवाई प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित गुह्यांचा तांत्रिक अहवाल हा पोलीस किंवा संबंधित यंत्रणेला दिला जातो. असे असताना या विभागात मुनष्यबळाची कमतरता नसणे हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. पण सद्यस्थितीत सायबर व अन्य गंभीर गुह्यांची प्रकरणे हाताळण्यासाठी 100 हून अधिक अधिकाऱ्यांची या विभागात कमरता आहे. अधिकाऱ्यांअभावी इतरांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतोय. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होत नसल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

एफएसएलसाठी एकूण एक हजार 461 पदे मंजूर आहेत, त्यापैकी एक हजार 10 पदे भरलेली आहेत. 30 मेपर्यंत 125 पदे भरण्यात येणार आहेत, पण विशेष करून सायबर विभागासाठी 100 हून अधिक अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. ती पदेदेखील लवकरात लवकर भरावी अशी मागणी तेथील कर्मचाऱ्यांची आहे.

कामाचा वेग वाढला

फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात कामाचा वेग वाढल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या कालावधीत 22 हजार प्रकरणे हातवेगळी करण्यात आली. तरीही अजून दीड लाख प्रलंबित प्रकरणे आहेत. रिक्त पदे भरल्यास ही प्रकरणे झटपट निकाली निघतील असेही अधिकारी, कर्मचारी सांगतात.

गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही कामात गती पकडली आहे. रिक्त पदे भरण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. आता प्रकल्प अधिकारी येत असल्याने आमचे हात आणखी बळकट होतील. आम्ही सर्वतोपरी झटपट प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे एफएसएलचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांनी सांगितले.

प्रकल्प अधिकाऱ्याचीच नियुक्ती कशाला?

एफएसएलमध्ये नव्याने प्रकल्प अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत आहे. एका माजी संचालकाची त्यासाठी वर्णी लागत आहे. या विभागामार्फत सध्या तीन प्रकल्प हाताळली जात आहेत. त्यासाठी संचालक व उपलब्ध स्टाफ पुरेसे आहेत. असे असताना प्रकल्प अधिकारी नेमण्याचा घाट घालण्यात आला आहे.