
मुंबईमध्ये दरवर्षी फेब्रुवारीअखेर सुरू होणारी नालेसफाई या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्यामुळे बहुतांशी नाले अजूनही कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. धारावीतून जाणाऱ्या मिठी नदीच्या प्रवाहात तर कचरा ओसंडून जात असल्याचे भयावह चित्र आहे. त्यामुळे एकीकडे नालेसफाई वेगाने सुरू असल्याच्या प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल होत आहे. कचऱ्याच्या सफाईसाठी आता फक्त दोन महिने शिल्लक राहिले असून मुंबईत अतिवृष्टी झाली तर मिठी नदीच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी भीती नदीकाठच्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याची ठिकाणे यामध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक वेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्तालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांमधील पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम हाती घेण्यात येते. फेब्रुवारी अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला नालेसफाई सुरू केली जाते. त्यामुळे पालिकेकडून नालेसफाई केली जाते.
असे होतेय काम
- पालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या सर्व कामांची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवण्यात आल्या आहेत.
- कंत्राटदाराला गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत. गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचे स्वतंत्र डंपिंग ग्राऊंड नसल्याने गाळ मुंबईच्या हद्दीबाहेर वाहून न्यावा लागणार आहे.
- मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्यासाठी, तरंगता कचराही काढण्यासाठी मनुष्यबळासह सील्ट पूशिंग पन्टून मशीन, मल्टीपर्पज ऑफ्मिबीअस पन्टून मशीन यांचा वापर करता येणार आहे.
आताच झाली सुरुवात
गेल्या वर्षी मार्च महिन्यात मिठी नदीच्या सफाईला सुरुवात झाली होती आणि 27 मार्चपर्यंत 30 टक्के सफाईचे काम पूर्ण झाले होते. मात्र, मिठीच्या सफाईला सुरुवात होऊन केवळ एकच दिवस झाला असून आतापर्यंत गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे मिठीतला गाळ 100 टक्के काढून नदीकाठच्या रहिवाशांना दिलासा देण्याचे काम पालिका कधी करणार, असा संताप नदीकाठचे रहिवासी विचारत आहेत.
असा काढला जातो गाळ
मिठी नदीतल्या पहिल्या दोन टप्प्यातील कामाला बुधवार, 2 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र, कुर्ला सीएसटी पूल ते कनेक्टर बीकेसी पूल या मिठीच्या मार्गावरील सफाईच्या कामासाठी अजूनही कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली नसल्यामुळे या दीड किलोमीटरच्या परिसराला सर्वाधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.