Mumbai News – बेपत्ता मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याचा ससून डॉकजवळ मृतदेह आढळला, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याचा समुद्रात मृतदेह तरंगताना आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सुनिल पाचार(23) असे मयत नेव्ही कर्मचाऱ्याचे नाव आहे. स्थानिक नागरिकांना ससून डॉकजवळ सुनिलचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच येलो गेट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुनिलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सुनिल हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. नोव्हेंबर 2024 पासून तो मालवाहू जहाजावर काम करत होता. नेहमीप्रमाणे 3 फेब्रुवारी रोजी तो जहाजाच्या डेकवर झोपला.मात्र सकाळी सहकाऱ्यांनी पाहिले असता तो तेथे नव्हता. त्याचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने सहकाऱ्यांनी येलो गेट पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवस त्याचा काहीच शोध लागला नाही. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी दुपारी स्थानिक नागरिकांना ससून डॉकजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.