कुर्ला येथे हॉटेलमध्ये भीषण आग

कुर्ला येथील ‘रंगून ढाबा’ या हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र यात हॉटेलचे सामान जळून खाक झाले आहे. कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्ग येथे ‘रंगून ढाबा’ या हॉटेलमध्ये रात्री 9 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीबाबत वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू होते. अग्निशमन दलाकडून 4 फायर इंजिन आणि 3 जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत हॉटेलमधील सामान जळाले. हॉटेलमध्ये आग कशामुळे लागली याचा अधिक तपास सुरू आहे.