शिवसेनेच्या दणक्यानंतर ‘केईएम’च्या गेटवर झळकली मराठी, इंग्रजीतील फलक बदलण्यासाठी केले होते आंदोलन

मुंबई महापालिकेच्या परळमधील केईएम रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त गेटबाहेर लावण्यात आलेले इंग्रजीतले सर्व स्वागत फलक शिवसेनेच्या दणक्यानंतर आता बदलण्यात आले असून सर्व गेटवर मराठीतून फलक लावण्यात आले आहेत. रुग्णालय प्रशासनाला इशारा देऊनही इंग्रजीतील फलक बदलून ते मराठीत केले नाही म्हणून शिवसेनेने फलकाला काळे फासले होते. त्यामुळे प्रशासनाला ताबडतोब इंग्रजीतील सर्व फलक बदलून मराठी स्वागत फलक लावणे भाग पडले. मराठी ही राजभाषा असून तिला नुकताच अभिजात भाषेचा दर्जाही मिळालेला आहे. त्यामुळे इंग्रजीऐवजी सर्व फलक मराठीतून करा, अशी मागणी करत शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आंदोलन केले होते.

एकीकडे मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला असताना केईएम शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त रुग्णालयाच्या सर्व गेटबाहेर मात्र इंग्रजी भाषेतून बोर्ड लावण्यात आले होते. हे फलक वर्षभर झळकणार आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून मराठीला डावलल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता. हे फलक ताबडतोब बदला नाही तर फलकाला काळे फासू असा इशारा शिवसेनेने दिला होता. इशारा देऊनही रुग्णालय प्रशासनाने फलक न बदलल्याने शिवसेनेने फलकाला काळे फासून निषेध व्यक्त केला होता.

मराठी भाषा बंधनकारक

मराठी भाषेला नुकताच अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला असून महाराष्ट्र शासनाने अधिनियम 2022 मध्ये महाराष्ट्रात प्रशासनाचा कारभार मराठी भाषेत करणे अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना केईएम प्रशासनाने मराठी फलक लावणे बंधनकारक होते, मात्र तरीही इंग्रजीत फलक लावल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता.

प्रथम इशारा, नंतर फासले काळे

शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केईएम रुग्णालयाकडून 18 ते 22 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी परदेशी पाहुणे येणार असल्याचे सांगत गेटवरील फलक इंग्रजीत लिहिण्याचा अट्टहास प्रशासनाकडून धरण्यात आला, मात्र कार्यक्रम संपून दोन महिने झाले तरी प्रशासनाने या ठिकाणचे इंग्रजी फलक काढून मराठी फलक लावले नव्हते. त्यामुळे शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या आदेशानुसार माजी नगरसेवक-बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत फलकाला काळे फासले होते.