चमचमीत खाद्यपदार्थ… दशावतारी नाटक… मंदिराची प्रतिकृती; गोरेगावात उद्यापासून भव्यदिव्य मालवणी जत्रोत्सव

गोरेगाव पश्चिम येथील बेस्ट नगर कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत बेस्ट नगर मैदानात हा जत्रोत्सव होणार आहे. जत्रोत्सवाचे यंदाचे 24 वे वर्ष असून यानिमित्त दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे आकर्षण म्हणजे प्रत्येक वर्षी कोकणातील एका मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली जाते आणि त्या ठिकाणी दहा दिवस पूजाअर्चा केली जाते.

ज्येष्ठ शिवसैनिक राजू रजपूत यांच्या संकल्पनेतून गोरेगावातील या मालवणी जत्रोत्सवाला सुरुवात झाली. गोरेगावकर या जत्रेची आतुरतेने वाट पाहतात. इतर ठिकाणी होणाऱया मालवणी जत्रेत चायनीज, राजस्थानी, पंजाबी पदार्थ मिळतात, परंतु या जत्रेत फक्त आणि फक्त मालवणी पदार्थांची दुकाने असतात. येथे प्रामुख्याने मालवणी खाद्य संस्कृतींच्या दुकानांना प्राधान्य देण्यात येते तसेच लघुउद्योग करणाऱया स्थानिक गोरेगावकरांना जत्रेत स्टॉल्स देण्यात येतात. याशिवाय मालवणी नाटक, रेकॉर्ड डान्स, मराठी-हिंदी गाण्यांचा ऑर्पेस्ट्रा, महाराष्ट्राची लोकधारा, दशावतारी नाटक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बेस्टनगर कला व क्रीडा मंडळ नुसते मालवणी जत्रोत्सवापुरते मर्यादित नसून वर्षभर गरजू लोकांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.