
मुंबईच्या मालाडमध्ये मोठा अपघात झाला आहे. पावसामुळे खोदलेल्या खड्याचा मोठा भाग अचानक खचून ढासळला आणि चार मजूर त्यामध्ये पडले. तीन जणांना तात्काळ वाचवण्यात आले, तर एका मजुराला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती मार्गावरील समुद्र बार आणि रेस्टॉरंटच्या परिसरात घडली. एमेटी डेव्हलपरच्या साइटवर काही मजूर काम करत होते. मात्र अचानक पावसामुळे खोदलेल्या खड्याच्या बाजूचा भाग ढासळला आणि त्यामध्ये चार मजूर दबले गेले. ढिगाऱ्याखाली चार मजूर अडकून पडले होते. एका मजुराने स्वत:ची सुटका केली. तर तीन मजुरांना तात्काळ नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात दाखल केले. दोन जणांना HBT रुग्णालयात दाखल केले, तर एकाला BDBA रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत प्रेमचंद जयस्वाल (वय 39) यांचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकल्प हा SRA चा असल्याचे सांगण्यात येत आहे.