कांजूर येथील जागा मिठागर आयुक्तांची की राज्य सरकारची याबाबचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागेच्या मालकी प्रकरणी केंद्र सरकारशी वाटाघाटी करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने आज हायकोर्टाला दिली. न्यायालयाने याची दखल घेत कांजूरच्या जागेवर तूर्तास कोणतेही काम करू नये, ‘जैसे थे’ स्थिती ठेवावी, असे दिलेले निर्देश कायम ठेवले आहेत. त्यामुळे मेट्रो 6 च्या कारडेपोला ब्रेक लागला आहे. कांजूरच्या मिठागराच्या जागेचा वाद कायम असताना 15 हेक्टर जागेवर एमएमआरडीएकडून मेट्रो 6 (श्री स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी ते विक्रोळी) करिता डेपो बांधण्यात येणार आहे त्याकरिता ही जागा एमएमआरडीएकडे राज्य सरकारकडून हस्तांतरित करण्यात आली असून उप मिठागर आयुक्त यांनी जागेच्या दाव्याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच ही जागा ताब्यात देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर आज शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, जागेचा वाद राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा असून तो सामंजस्याने सोडवण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी संपर्क करण्याचा विचार करत असून तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने आणखी वेळ द्यावा. त्यावर हायकोर्टाने 6 आठवडय़ांचा सरकारला अवधी देत सामंजस्याने तोडगा निघाल्यास त्याबाबत कळवण्यास सांगितले. त्याचबरोबर काम जैसे थे ठेवण्याबाबत दिलेले अंतरिम आदेश कायम ठेवले.
- आरे तील मेट्रो कारशेड कांजूर मार्ग येथे हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र केंद्र सरकारने याला आक्षेप घेत मिठागर आयुक्तांनी या जागेवर आपला दावा केला आहे.