वाल्मीक कराडला मोक्का कधी? राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 302चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही. हे संपूर्ण प्रकरण लोकांच्या स्मरणातून काढून टाकण्यासाठी चालढकल केली जात आहे, असा आरोप करतानाच, वाल्मीक कराडला मोक्का कधी लावणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी आका – काका म्हणणारा नाही, मी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेणार. कराडवर कारवाई जाणीवपूर्वक टाळली जात आहे. काही दिवसांत लोक विसरून जातील असे सरकारला वाटत आहे. आपल्या पक्षातील एका मंत्र्यावर सातत्याने आरोप होत आहेत, त्यामुळे पक्ष अध्यक्ष म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा घेणे हे अजित पवार यांचे कर्तव्य होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना बीड प्रकरणाची न्यायाधीशांद्वारे चौकशी होईल आणि आरोपींवर मोक्का लावला जाईल, असे आश्वासन दिले होते. तरीही अद्याप त्या दिशेने काहीच हालचाल नाही, असे आव्हाड म्हणाले. कराडला अटक करू शकत नाही ते सरकार दाऊदपर्यंत काय पोहोचणार, असा टोलाही त्यांनी लगावला.