खरेदीचा बहाणा करून आलेल्या चोरट्याने शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्सचे 1 कोटी 93 लाखांचे दागिने पळवल्याची घटना आग्रीपाडा परिसरात घडली. चोरट्याने ज्वेलर्सवर हल्लादेखील केला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहेत.
तक्रारदार हे व्यावसायिक असून त्याचे सातरस्ता येथे एक ज्वेलर्सचे दुकान आहे. रविवारी दुपारी ते दुकानात बसले होते. तेव्हा दोन जण त्याच्या दुकानात आले. त्या दोघांनी सोन्याचे दागिने खरेदी करायचे असल्याचे सांगितले. त्यांवर विश्वास ठेऊन ज्वेलर्सने सोन्याचे दागिने दाखवले. दागिने दाखवल्यानंतर काही कळण्यापूर्वी त्या दोघांनी ज्वेलर्सला घातक शस्त्राचा धाक दाखवला. त्यानंतर दुकानातील 1 कोटी 96 लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने घेऊन चोरट्याने पळ काढला.
चोरट्याने ज्वेलर्सवर हल्लादेखील केला. त्यानंतर चोरटे हे दागिने आणि पैसे घेऊन निघून गेले. काही वेळाने ज्वेलर्सने स्वतःची कशीबशी सुटका केली. या घटनेची माहिती आग्रीपाडा पोलिसांना दिली. काही वेळातच आग्रीपाडा पोलीस घटनास्थळी आले. ज्वेलर्सने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला. दिवसाढवळ्या घडलेल्या त्या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. तपासासाठी एक पथक तयार केले आहे.