
लग्नानंतर महिनाभरातच विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी छळणार्या पती व त्याच्या आई-वडिलांना मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दणका दिला. सासरच्या छळाला त्रस्त झालेल्या महिलेला तिच्या भावाने वाचवले आणि माहेरी आणले. त्यानंतर महिलेने अंतरिम पोटगी मागत दंडाधिकारी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने तिचा कौटुंबिक छळ झाल्याच्या युक्तिवादाचा स्विकार केला. सासूबाई सुनेला वारंवार जेवण बनवण्यावरुन टोमणे मारायची. जेवण नीट जमत नाही असे बोलत तिला किचनमध्ये पाठवले जात नव्हते. हा सगळा प्रकार कौटुंबिक छळ आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
चेंबूर येथील महिलेने पती व सासू सासर्याविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत अंतरिम पोटगीचा दावा केला होता. पती व सासरच्या लोकांनी अर्जदार महिलेला माहेरहून 20 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. अर्जदार महिलेचे सगळे दागिने सासूने स्वतःच्या ताब्यात ठेवले होते.
महिला फक्त दहावी शिकली. तिच्या कमी शिक्षणावरुन तसेच जेवण बनवता येत नसल्याच्या कारणावरून तिला त्रास दिला जात होता. पती महिलेला पनवती असल्याचे हिणवत होता, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावरून विवाहित महिलेचा कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अर्जदार महिलेला 7 हजार रूपयांची अंतरिम पोटगी मंजूर केली.