मुंबईतील महत्वाच्या घडामोडी

लालबागच्या राजाचा मुकुट 16 कोटींचा

लालबागच्या राजाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे राजाला 20 किलो सोन्याचा नक्षीदार मुकुट अर्पण करण्यात आला आहे. हा मुकुट राजाला रिलायन्स फाऊंडेशनने अर्पण केला असून पाचू आणि मीनांचा या रत्नजडित मुकुटाची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. हा मुकुट साकारण्यासाठी कारागिरांना दोन महिन्यांचा कालावधी लागला.

अनंत अंबानी कार्यकारी समितीच्या प्रमुख सल्लागारपदी

‘लालबागचा राजा’ मंडळाच्या कार्यकारी समितीच्या प्रमुख सल्लागारपदी उद्योगपती अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली. महिनाभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली योगदानाची दखल घेऊन लालबागचा राजा मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

कर्मयोद्धा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

कर्मयोद्धा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. कर्मयोद्धा या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते झाले. माजी लष्कर अधिकारी महादेव भाऊ माळी (दादा) यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाला सरकारी वकील विकास माळी, अर्जुन पुरस्कार प्राप्त राजू भावसार, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना अध्यक्ष सुधाकर शानबाग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

माधवी बुच यांच्याविरोधात सेबीचे कर्मचारी रस्त्यावर

हिंडेनबर्ग रिसर्च फर्म, काँग्रेससह विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भारतीय बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच नव्या वादात अडकल्या आहेत. बुच यांच्याविरोधात आता सेबीचे कर्मचारीच रस्त्यावर उतरले आहेत. सुमारे 200 कर्मचाऱ्यांनी सेबीच्या मुंबईतील मुख्यालयाबाहेर निदर्शने करत माधवी बुच यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सेबीमध्ये काम करताना प्रचंड दडपण येते. येथील वातावरण कामासाठी अनुकूल नाही, असा आरोप करत सेबीच्या काही कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवले होते.

अल्पवयीन मुलीचा मृत्यू; तीन डॉक्टर दोषमुक्त

अंडकोश काढल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथे घडली होती. याप्रकरणी तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या तिन्ही डॉक्टरांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. डॉ. किर्तीकुमार त्रिवेदी, डॉ. गौरी सुलताने व डॉ. हेता केनिआ यांनी दोषमुक्तीसाठी याचिका केली होती. न्या. आर. एम. जोशी यांच्या एकल पीठाने ही याचिका मंजूर केली. प्रथमदर्शनी या डॉक्टरांविरोधात कोणताच ठोस पुरावा नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

चेंबूरमध्ये सोमवारी शास्त्रीय संगीत मैफील

गणेशोत्सवात अभिजात शास्त्रीय संगीत मैफिलींची परंपरा कायम ठेवत चेंबूर येथील नेल्लाई सोसायटीच्या रहिवाशांनी ‘त्रिभुक्ती’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता नेल्लई हाईट्स, स्वस्तिक पार्क, चेंबूर येथे हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमात प्रसिद्ध कलावंत स्वीकार कट्टी (सतार), हृषींकेश मजुमदार (बासरी ) आणि रोहित देव (तबला) एकत्रित कलाविष्कार सादर करतील. रसिकांना प्रवेश विनामूल्य आहे. पूर्वी गणेशोत्सवात अभिजात संगीताचे भरपूर कार्यक्रम व्हायचे. मात्र आता सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा लोप पावत आहे. या परंपरेचे पुनरुज्जीवन व्हावे या हेतूने नेल्लाई सोसायटीने हा उपक्रम आयोजित केला आहे.

15 दिवसांत 1 हजार कोटी जमा करण्याचे सहारा समूहाला आदेश

सर्वोच्च न्यायालयाने आज सहारा समूहाला पुढच्या 15 दिवसांच्या आत एका एस्क्रो खात्यात म्हणजेच सेबी सहारा फंडमध्ये 1 हजार कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले. सहारा इंडिया रियल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांना ही रक्कम जमा करावी लागणार आहे. याशिवाय न्यायालयाने सहारा समूहाच्या वर्सोवा येथील जमिनीच्या विकासासाठी एका संयुक्त उद्योगात सहभाग घेण्याच्या कंपनीच्या प्रस्तावालाही हिरवा झेंडा दाखवला. या प्रस्तावाचा मूळ उद्देश 10 हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करणे हा आहे. एस्क्रो खात्यामध्ये दोन किंवा त्याहून अधिक पार्ट्यांद्वारे ट्रस्टमध्ये आर्थिक व्यवहार केले जातात.