पत्नीच्या पैशांच्या मागणीला कंटाळून पतीने चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपी पतीला दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. नितीन जामधे असे आरोपी पतीचे तर कोमल जामथे असे मयत पत्नीचे नाव आहे.
नितिन बँकेत नोकरी करत होता, तर कोमल खाजगी कंपनीत नोकरी होती. दोघांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र दोघांच्या कुटुंबाचा विरोध आणि पैशांवरून दोघांमधील भांडण यामुळे दोघेही वेगळे राहत होते. नितीन जेव्हा आपल्या पत्नीला आपल्याकडे बोलवायचा तेव्हा ती पैशांची मागणी करायची. पत्नीच्या सततच्या पैशांच्या मागणीने नितीन वैतागला होता.
पतीपासून वेगळी राहत असलेली कोमल दुसऱ्या मुलासोबत फिरायची. नितीनने दोघांचा फोटोही व्हायरल केला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी कोमलने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
नितीनने रविवारी कोमलला मित्राच्या घरी भेटायला बोलावले होते. यावेळीही कोमलने पैशाची मागणी केली. यामुळे संतापलेल्या नितीने चाकूने तिच्या गळ्यावर, पाठीवर, हातावर वार केले. यात गंभीर जखमी कोमलचा मृत्यू झाला. यानंतर कोमलचा मृतदेह बाथरुममध्ये ठेवून नितीन पळून गेला.
शेजाऱ्यांमुळे ही घटना उघडकीस आली. कोमलच्या आईच्या फिर्यादीवरून दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.