दाढी-मिशा वाढवून चेहरा बदलला तरी आरोपीला दहा मिनिटांत पडणार बेड्या, गृह विभागाने तयार केली ‘मार्व्हल’ प्रणाली

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने आता ‘एआय’चा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता ‘महाराष्ट्र अ‍ॅडव्हान्स रिसर्च अ‍ॅण्ड व्हिजिलन्स अ‍ॅडव्हान्स लॉ एनफोर्समेंट लिमिटेड’ अर्थात ‘मार्व्हल’ नावाची प्रणाली तयार केली आहे. एखादा गुन्हेगार राज्यातून फरार झाला. दाढी-मिशा वाढवून चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला तर एका वेळेला किमान दहा शहरांतील एका महिन्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दहा मिनिटांत फरार आरोपीचा चेहरा ‘एआय’च्या माध्यमातून ओळखता येईल, अशी यंत्रणा राज्याच्या गृह विभागाने तयार केली आहे.

नंदुरबारमधील हत्या उघड

‘मार्व्हल’ प्रणालीत एआयच्या माध्यमातून नंदुरबारमधील एका हत्येतील आरोपी पकडला होता. या घटनेतील आरोपीचा अत्यंत अंधुक फोटो होता. त्याच्या मोटरसायकलची नंबरप्लेटही दिसत नव्हती. पण पोलिसांनी या एआयच्या माध्यमातून आरोपीचे अचूक रेखाचित्र, नंबरप्लेटही तयार केली. आणि आरोपीला 48 तासांमध्ये अटक केली.

सीमांवर संशयास्पद हालचाली टिपणार

‘महाराष्ट्र अ‍ॅडव्हान्स रिसर्च अ‍ॅण्ड व्हिजिलन्स अ‍ॅडव्हान्स लॉ एनफोर्समेंट लिमिटेड’ अर्थात ‘मार्व्हल’ नावाची प्रणाली ‘आयआयएम’सोबत तयार केलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही मदत निवडणूक काळात मार्व्हलच्या माध्यमातून राज्याच्या गृह विभागाची मदत घेतली होती. या माध्यमातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून राज्यातल्या स्मार्ट सिटीवर देखरेख, राज्याच्या सीमांवरील चौक्यावर संशयास्पद वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम करता येते.

मार्व्हलच्या माध्यमातून गृह विभागमार्फत परिवहन, वन विभाग, कारागृह विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागांना मदत केली जात आहे.

‘एआय पॉवर ऑबजेक्ट डिटेक्शन’, ‘एआय पॉवर सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण’ ‘सीडीआर’, ‘आयपीडीआर’, ‘टीडीआर’, ‘एआय पॉवर चॅट विश्लेषण’, ‘कॅरेक्टर रेक्गनेशन ट्रकिंक’ही या प्रणालीच्या माध्यमातून करता येते.

‘फेस रेक्गनेशन’ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दहा मिनिटांत ‘एआय’ प्रणाली किमान दहा शहरांतील एक महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज पाच ते दहा मिनिटांत ट्रक करते. त्यामुळे एखाद्या आरोपीने दाढी-मिशी वाढवून चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचा माग काढता येतो.