विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता सुटणार; हायकोर्ट आज अंतिम निकाल जाहीर करणार

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या तत्कालीन मिंधे सरकारने खोडा घातल्यामुळे रखडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन मिंधे सरकार व तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बेकायदेशीर भूमिकांवर आक्षेप घेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर उच्च न्यायालय आज दुपारी अंतिम निकाल जाहीर करणार आहे. या निकालामुळे 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता सुटणार असल्याने याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने प्रदीर्घ सुनावणी घेत अंतिम निकाल राखून ठेवलेला आहे. याबाबत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांचे खंडपीठ निकाल जाहीर करणार आहे.

विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्त्या साडेतीन वर्षांपासून रखडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने नावांची शिफारस करून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तशी यादी पाठवली होती. कोश्यारी यांनी त्या यादीवर वेळीच निर्णय घेतला नाही, यादी जाणूनबुजून रखडवली. नंतर मिंधे सरकारने नियुक्ती प्रक्रियेत खो घातला, याकडे याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.