भविष्य निधीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

भविष्य निधी सेवानिवृत्त कल्याणकारी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी वांद्रे येथे संपन्न झाली. या सभेत सदस्यांना पेन्शन कम्युटेशनचा कालावधी सरकारकडून कमी करण्यासंदर्भात व काही सदस्यांच्या निवृत्त फंडातील रोखलेली रक्कम परत मिळवण्यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेच्या विद्यमान नियमावलीत सुचविलेला बदल करण्याकरिता गोवर्धन जिल्ला यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. या सभेत सरचिटणीस जनार्दन नारकर यांनी सभेपुढे विद्यमान नियमावली ही सद्यस्थितीत कालबाह्य असल्याचे नमूद करत, 26 व्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात विशेष समितीचे गठन उपाध्यक्ष लहू काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवर्धन जिल्ला, स. यादगिरी, साईनाथ परब, अशोक पवार यांच्या समितीने गेले सहा महिने परिश्रम घेत संस्थेच्या नियमावलीत कालानुरुप बदल सुचवले. त्यामध्ये महिला सदस्यांना योग्य प्रतिनिधित्व, विद्यमान कार्यकारी मंडळाची पुनर्रचना, निवडणूक प्रणालित सुधारणा, मुंबईत वास्तव्य करणारे, पण मुंबई व्यतिरिक्त भविष्य निधी कार्यालयातून सेवानिवृत्त कर्मचारी आता या संस्थेचे सभासद होऊ शकतील, असे समितीने सुचविलेले नियम सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

ही सभा यशस्वी करण्यासाठी नारायण बांदेकर, सुरेश राणे, सुनीता अधिकारी, विलास नागोटकर यांनी मेहनत घेतली. भविष्य निधी वांद्रे कार्यालयीन आयुक्त अशरफ कामिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जनार्दन नारकर यांनी आभार मानले.