Mumbai News – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचा पर्दाफाश, 9 कोटींचे हिरे आणि सोने जप्त

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने तस्करीचा पर्दाफाश केला. सीमाशुल्क विभागाने 11 आणि 12 फेब्रुवारी दरम्यान कारवाई करत 9.12 कोटी रुपयांचे सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने एका व्यक्तीला अटक केली आहे.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 6 किलो सोने आणि 2,147 कॅरेट हिरे जप्त केले. बेल्ट बकल, ट्रॉली बॅग आणि अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवून ठेवले होते. तर हिरे लॅपटॉपमध्ये लपवण्यात आले होते.

पहिल्या घटनेत मुंबईहून बँकॉकला चाललेल्या प्रवाशाच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्या. त्या व्यक्तीला तात्काळ एअर इंटेलिजन्स युनिटकडे सोपवण्यात आले. त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे 2,147.20 कॅरेट हिरे आढळू आले. याची बाजारात किंमत 4,93,05,850 रुपये आहे. अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत दुबईहून मुंबईला आलेल्या तीन प्रवाशांकडून 775 ग्रॅम वजनाच्या 24 कॅरेट कच्च्या सोन्याच्या रोडियम प्लेटेड अंगठ्या आणि बटणे जप्त करण्यात आली. याची बाजारात किंमत 61, 45, 347 रुपये आहे. बेल्ट बकल आणि ट्रॉली बॅगमध्ये हे सोने लपवण्यात आले होते.

तिसऱ्या घटनेत नैरोबीहून मुंबईला आलेल्या 14 केनियन नागरिकांना अटक करत त्यांच्याकडून 22 कॅरेटच्या वितळलेल्या सोन्याचे बार आणि 2,741 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 1.85 कोटी रुपये आहे.